तुम्ही तुमचे पक्ष, झेंडे अन् बाप वाचवले... आमच्या शेतकरी बापाचं काय??
आपल्या पोटच्या पोराने धोका द्यावा तसा सरकारने शेतकऱ्यांना दिला. शेतकरी आजवर हजारो अवकाळी पावसाळी संकटाला तोंड देऊन आता सहनशील झाला आहे. पण ४०% निर्यात शुल्क लावणेपण हा धक्का निसर्गनिर्मित नव्हता आपल्याच मायबाप मानल्या जाणाऱ्या सरकारने दिलेला हा धक्का म्हणजे शेतकऱ्याचा विश्र्वासघातच नाही का? कधी नव्हे तेच जागतिक बाजारात कांदा तेजीत दिसला, शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या, आणि कसबसा जपून ठेवलेला कांदा कंटेनर मध्ये भरून बाजारात पोहोचला. प्रचंड आशा उराशी बाळगून निर्यात करण्यास तयार झाला. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. देशांतर्गत मालाची भाववाढ रोखण्यासाठी निर्यातीवर ४० टक्के कर लादून शेतकऱ्याच्या आनंदावर विरजण टाकण्याचं आणि त्याच्या अन्नात विष कालवण्याच पाप त्याच्याच देशातील सरकारने केलं. आपल्याच घरून झालेली घरफोडी ही त्या शेतकरी बापासाठी धक्कादायक होती. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये निर्यात ६३% ने वाढल्याचे अहवाल सांगतो. देशातील २४.२५ दशलक्ष टन उत्पादन अडचणीत सापडले. पैक...