तुम्ही तुमचे पक्ष, झेंडे अन् बाप वाचवले... आमच्या शेतकरी बापाचं काय??

 

आपल्या पोटच्या पोराने धोका द्यावा तसा सरकारने शेतकऱ्यांना दिला. शेतकरी आजवर हजारो अवकाळी पावसाळी संकटाला तोंड देऊन आता सहनशील झाला आहे. पण ४०% निर्यात शुल्क लावणेपण हा धक्का निसर्गनिर्मित नव्हता आपल्याच मायबाप मानल्या जाणाऱ्या सरकारने दिलेला हा धक्का  म्हणजे शेतकऱ्याचा विश्र्वासघातच नाही का? 
         

       कधी नव्हे तेच जागतिक बाजारात कांदा तेजीत दिसला, शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या, आणि कसबसा जपून ठेवलेला कांदा कंटेनर मध्ये भरून बाजारात पोहोचला. प्रचंड आशा उराशी बाळगून निर्यात करण्यास तयार झाला. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. देशांतर्गत मालाची भाववाढ रोखण्यासाठी निर्यातीवर ४० टक्के कर लादून शेतकऱ्याच्या आनंदावर विरजण टाकण्याचं आणि त्याच्या अन्नात विष कालवण्याच पाप त्याच्याच देशातील सरकारने केलं. आपल्याच घरून झालेली घरफोडी ही त्या शेतकरी बापासाठी धक्कादायक होती. 

         २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये निर्यात ६३% ने वाढल्याचे अहवाल सांगतो. देशातील २४.२५ दशलक्ष टन उत्पादन अडचणीत सापडले. पैकी महाराष्ट्रातील ३७. २ टक्के कांदा इतका सर्वाधिक वाटा असलेला कांदा अखेर पुन्हा डोळ्यात पाणी देऊन गेला. उत्पादनाचा सरासरी आकडा १८० ते २०० दशलक्ष मेट्रिक टन पैकी आजपर्यंत फक्त १.४६ दशलक्ष मेट्रिक टन निर्यात झाला. आपल्या पोटच्या पोराने धोका द्यावा तसा सरकारने शेतकऱ्यांना दिला. शेतकरी आजवर हजारो अवकाळी पावसाळी संकटाला तोंड देऊन आता सहनशील झाला आहे. पण ४०%  निर्यात शुल्क लावणे हा धक्का निसर्गनिर्मित नव्हता आपल्याच मायबाप मानल्या जाणाऱ्या सरकारने दिलेला हा धक्का म्हणजे शेतकऱ्याचा विश्र्वासघातच नाही का? त्यात आमचा शेतकरी संघटित नाही. उस उत्पादक शेतकरी अडचणीत तेंव्हा कांदा उत्पादक मूग गिळून बसतो.. कांदा उत्पादक अडचणीत तेंव्हा उस उत्पादक मग गिळून बसतो. तश्यात ज्याला बाजार सापडला , तो आता शांत झाला. मुळात शेतकऱ्यांमध्ये एकी नसल्याचे हे सगळे दुष्परिणाम म्हण्याचे का? 

       शेतकरी नेते शरद जोशी म्हणायचे " शेतकऱ्याच्या बाहत्तर रोगावरच एकच औषध ते म्हणजे शेतमालाला हमीभाव" . इथे हमीभाव घोषित होतात. प्रत्यक्ष खरेदी रक्कम मात्र अडत्या हमालीवारी पुरत नाही. इथे शेतकऱ्यांना टीव्ही वरून सल्ले देणारे महाभाग कुठे कमी आहेत. शेतकरी नेते म्हणवणारे आजचे महाभाग त्यांना सत्तेत वाटा मिळाला की ढेकर देऊन बाजूला होतात. बाकीचे उरले सुरले सत्ता, पक्ष,आणि झेंडे ,बाप वाचवण्यासाठी धडपडत आहेत. 

 आणि मग यशवंत मनोहर यांच्या शब्दात बोलावं लागतं.. 

 

       कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही

       सदरहू पीक आम्ही आसवांवर काढलेले आहे

       

सरकार आज शेतकरी आणि भिकारी यातील फरक विसरून गेलं आहे. शेतकऱ्याला भिक म्हणून वार्षिक काही रक्कम देऊन शेतकरी सन्मान दिल्याच्या आविर्भावात सरकारे आहेत.

 'आम्हाला भीक नको, शेतमालाला हमीभाव द्या ' 

 हे जीव तोडून सांगतोय शेतकरी. भाजीपाला पडला, टोमॅटो भाव पडला, कांदा पडला आता सन्मान कुठे उरला सरकार? 

     शेतकरी नेते कुठल्या बिळात लपून बसले माहीत नाही. आता शेतकऱ्यांनी त्याची बाजू मांडायला नेता शोधत बसता काम नये. सोशल मीडिया वर शेतकऱ्यांनी त्यांना होणाऱ्या व्यथा मांडल्या पाहिजे. खोट्या लबाड आश्वासनांना भूलथापांना बळी पडू नये. आता शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे. जिथे असाल तिथून आपल्या दुःखाची कहाणी मांडली पाहिजे. (आकडेवारी संदर्भ - विविध वृत्तपत्रातील प्रकाशित आकडेवारी)



ॲड. बिभीषण गदादे (वकील -प्रथमवर्ग ,सत्र व जिल्हा न्यायालय पुणे)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारणाच्या चिखलात मतदाराचा विश्वासघात होतोय?

राजकारण...आणि आम्ही.