राजकारण...आणि आम्ही.
राजकारण...आणि आम्ही.
_ॲड. बिभीषण गदादे
राजकारण..आम्हाला काय इंटरेस्ट नाही. असं म्हणलं म्हणजे आपण फार काही शहाणं झालो असं समजायचं मुळीच कारण नाही. माणुस हा समुहाने राहणारा प्राणी आहे. समुह म्हणलं की समुहाच्या अस्तित्वासाठी नियम आले. नियम मग ते बनवणारी शाखा अाली, ती राबवणारी यंत्रणा आली , यंत्रणेसाठी खर्च आला..अर्थकारण आलं आणि मग पुन्हा त्याचेही नियम आले. या नियमाला बनवणारी सरकार नावाची यंत्रणा आली. जी जन्म घेते राजकारणातून.. म्हणुन कितीही शहाणपण वापरून राजकारणाकडे दुर्लक्ष केलं तरी तोटा जनतेचाच होणार आहे. हे समजून घ्यायला हवं.
पटो किंवा न पटो समाजात अस्तित्वासाठी प्रत्येकाचा अंतर्गत लढा चालू असतो. तसाच भारतीय समुहातही हा लढा हजारो वर्षापासून लढला जातोय. या लढ्याला वेगवेगळ्या पातळीवर लढता येतं. जसं, घरातले नियम आणि अंमलबजावणी साठी घरात कोण राजा असावा यासाठी मातृसत्ताक व पितृसत्ताक व्यवस्थांमध्ये राजकारण आहे. गावचा कारभार कोणी पहायचा यावरून सरपंच पदावरून राजकारण आलं. सांस्कृतिक लढ्यात, वेगवेगळ्या विचारधारांतील लढ्यात राजकारण आलं. अर्थकारणात शोषित वर्ग आणि शोषणकर्ता वर्ग याचं राजकारण आलं. मुळात आपण प्रत्यक्ष असो की अप्रत्यक्ष असो राजकारणाचा भाग आहोत हे मान्य करावे लागेल.
आज राजकारणात अस्मितावादाचं राजकारण फार जोम धरीत आहे.पहिले अडाणी होतो तेव्हा स्वताच्या अस्तित्वाची जाणिव नसायची. 'ठेविले अनंत तैसेची रहावे.. ' या उक्तीप्रमाण जगणं जगावं लागायचे, मुळात पर्याय नव्हता जास्त वळवळ करायला केलो तर तेवढं ज्ञान नव्हतं. सामान्य माणुस आता आताशी कुठेतरी अस्तित्वाबाबत प्रश्न विचारू लागला आहे. आपण निवडून दिलेल्या व्यवस्थेला प्रश्न विचारला पाहिजे. तो आपला हक्क आहे. हल्ली राजकारणात प्रश्न कमी गळचेपी जास्त होतेय. अाक्रमक अस्मितावादाचं राजकारण जोम धरत आहे. मनात नसताना भलत्या मुद्यावर भावनिक केलं जात आहे. आणि जात, प्रांत, भाषा आणि धर्माच्या नावावर भडकावलं जात आहे. मुळात जात,धर्म ,प्रांत अशा गोष्टी मानवी कल्याणाचे मापदंड नाहीत हे समजून घ्यायला हवं. मानवी प्रगतीच्या वाटा अशा गोष्टीमुळे अडखळत असतील तर हे थांबायला हवं.
पेट्रोलचे दर वाढले, गॅसचा भाव वाढला, गोडेतेल महाग झालं पन माणसांची किंमत मात्र तेवढीच राहीली हे सत्य नाकारून कसं चालेल. खरच आपले जीवनमान उंचावले का? आपण पुढिल दहा वर्षे सोडा पाच वर्षाची तरी तरतूद केली का? आपल्याकडे नसेल तर मग सरकार कडे आपल्या प्रगतीचा रोडमॅप आहे का? नेत्याची उंची किती यावरून जनतेची उंची मोजता येते का? नेते ज्या सुखसोयी उपभोगत आहेत खरच ३०टक्के जनता तरी त्या अवस्थेत जगत आहेत का? नाही नं ,मग राजकारणाशी काही संबध नाही म्हणण्यासारख घडलं तरी काय? मुळात नागरिकांचं जीवनमान किती खालावले हे मोजायचे असेल तर त्याची नितीमत्ता किती पैसे दिले की तो विसरतो त्यावरून ठरवावी. इथे १०० रुपयांसाठी माणसं आपला इमान विकतात. सरकारी नोकर १०० च्या नोटेवर आपले कर्तव्य विसरत असेल तर आणि १०० रूपयाच्या नोटेवर मतदार आपली जबाबदारी विसरत असेल तर आपली लायकी किती खालच्या पातळीवर गेली याचा विचार करायला हवा. कोणत्याच सामान्य माणसास आजतरी शिक्षण आणि आरोग्यचा खर्च पेलावत नाही. हे वास्तव आहे. मग आपल्या जीवनमान उंचावणार कसे? कोण उंचावणार? शेवटी इतका भरमसाठ कर सरकारास द्यायचा आणि गप्प बसायचं.प्रश्न विचारायला नको का? बकर्यासारख सुरी खाली मान किती दिवस द्यायची? सरकारे उपटसुंभासारखी भांडत आहेत. नेते चिखल फेकत आहेत. अन आरोप प्रत्यारोप खेळत आहेत आणि आपण? आपण रात्रंदिवस कष्ट करून शेवटी गप्प बसायचं?
खरं तर यापासून आपला देश , देशाचे सार्वभौमत्व, देशातील बंधुता, एकता अबाधित राखण्याचे काम आपल्याला करावं लागणार आहे. कष्टकरी, कामगार, शेतकरी वर्गाच्या घामाला दाम मिळणे गरजेचं आहे ,नव्हे तो हक्क आहे. नव्या दमाच्या विचारी तरूणांनी संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देऊन सर्वधर्मसमभाव जपण्यास प्राधान्य द्यावद्यावं. त्यासाठी ज्यांच्याकडे राजकारणासाठी आवश्यक कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व आहे त्यांनी राजकारणात जायला हरकत नाही. राजकारण वाईट नाही राजकारणाकडे चांगली माणसे जात नाहीत हे वाईट आहे. सामाजिक हिताचे, सामाजिक परिवर्तनाचे मुद्दे घेऊन तरूणांनी राजकारणात यायलाच हवं. किमान निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारा.पुढिल ध्येयधोरणे विचारा. गरज पडेल तिथे टिकाही करा. विरोधही करा.. ते सुद्धा गरजेचं आहे. राजकीय प्राबल्य नसला तर तो समुह दुबळा असतो.
ॲड. बिभीषण गदादे
सं-७७०९३१३४३
दि. ०७/०५/२०२२

खूपच वास्तव आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवातंतोतंत
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
हटवा