स्त्री आणि स्त्रीची अस्मिता

 

दोन दगडाच्या जात्याच्या पाळूमध्ये कडधान्य टाकत त्यावर वेदनेच्या अन् दुःखाच्या ओव्या गात, आयुष्यभर संसाराचं जातं फिरवते ती असते एक स्त्री...कधी ती  इतिहासाच्या पानावरती जिजामाता- सावित्रीबाई- अहिल्यादेवी-रमाबाई म्हणून पहावयास मिळाली  तर कधी  कोणाची आई, बहीण, मावशी,आजी, पत्नी,सून म्हणून पाहायला मिळाली. ही स्त्री कधी पाणपोया, घाट, कुंड उभारून जनसेवेचे व्रत घेणारी आदर्श लोकसेवकअहिल्यादेवी होळकर म्हणून पाहायला मिळाली. कधी ती असमानतेच्या विरोधात समतेचा असूड घेऊन शिक्षणाची मशाल पेटवणारी, मनुवादी व्यवस्थेच्या छताडावरती बसून क्रांती करणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणून पाहायला मिळालीतर कधी आजच्या काळातील डॉक्टर ,वकील ,इंजिनियर म्हणून पाहायला मिळाली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या रूपाने समाज व्यवस्थेत खालच्या स्तरात गणल्या गेलेल्या समाजात जन्म घेऊनही जगातील आदर्श राज्यकर्ती म्हणून उदयास आली . कधी याच व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह करणारी तर कधी इथल्या कुटुंब व्यवस्थेचा गाडा हाकणारी.. 

 कधी ही स्त्री आजच्या काळातील ज्ञान विज्ञानाच्या कक्षा ओलांडून तराळ अंतराळापर्यंत झेप घेणारी स्त्री म्हणून पाहायला मिळाली. मंदिरांमध्ये अनेक शस्त्र हातामध्ये घेतलेल्या देवीच्या रूपाप्रमाणे अनेक रूपात आढळणारी ,अनेक संकटांशी दोन हात करणारी ती म्हणजे एक स्त्री.. इथल्या धर्म व्यवस्थेने हजारो वर्ष गुलामीत ढकललेली तरीही अवघ्या जगाचा पोट भरणाऱ्या शेती या व्यवसायाचा शोध लावणारी  निऋत्ती दुर्गा ही सुद्धा एक स्त्रीच.

स्त्री देवळात देवी, शाळेत सरस्वती, आणि घरात लक्ष्मी म्हणून पुजली जात असली तरीही अन्याय, अत्याचार, बलात्कार, रूढी, परंपरा, हुंडाबळी, ऍसिडहल्ले, यांच्या दृष्टचक्रात कायम भरडली जाणारी ती सुद्धा एक स्त्रीच... याच स्त्रियांना सामाजिक जाचातून मुक्त करण्याचा प्रयत्न हजारो वर्षापासून अनेक समाजसेवकांनी केला त्याला काही अंशी यश आलं तर बऱ्याच अंशी अपयशाला सामोरे जावं लागलं. सामाजिक प्रथांच्या विरोधात लढणाऱ्या यादीत एक नाव प्रकर्षानं आणि प्रामुख्यानं घ्यावं लागेल ते म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.

इथल्या व्यवस्थेच्या विरोधात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले म्हणून उभे राहिली,लढली आणि जिंकली सुद्धा पण आजच्या परिस्थितीकडे पाहिलं तर तीच ती सावित्री आज खरंच जिंकली का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी शाळा सुरू केली, विधवा केशवपन बंदी, विधवेच्या मुलाला दत्तक घेतलं, अडलेल्या ,नडलेल्या आणि व्यवस्थेच्या बळी पडलेल्या स्त्रियांची बाळंतपण केली, हे कार्य सावित्रीबाई फुले यांनी केलं म्हणजे स्त्रियांना सन्मान मिळाला असं होत नाही. एवढ्या पुरता इतिहास समजून घेणे योग्य नाही मुळात सावित्रीबाई हया त्यांच्या कार्यान नाही तर कार्या पाठीमागच्या विचारांनी समजून घेतली पाहिजे. एक शाळा सुरू केली म्हणजे सगळ्या स्त्रियांना शिक्षण देणे असा मुळीच अर्थ नाही. या व्यवस्थेने याच स्त्रियांना शिक्षणाचा पर्यायाने माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला होता. माणूस म्हणून जगण्याचा नाकारलेला अधिकार पुन्हा मिळवणे हा त्या पाठीमागचा विचार आपण समजून घेतला पाहिजे. ज्याची आज गरज आहे. अधिकार हे कोणाच्या उपकाराने मिळत नाहीत, न्याय समता हे कोणी उपकारकर्त्याने भेट द्यायची गोष्ट नाही तर समतेसाठी लढा द्यावा लागतो. गरज पडली तर प्रसंगी आपल्याच व्यवस्थेच्या विरोधात विद्रोह पुकारावा लागतो.  डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,

              हक्क मागून मिळत नाहीत, ते झगडून घ्यावे लागतात”.

                                  पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे जीवन चरित्र आणि आजच्या काळातील स्त्रिया या विषयाचा अभ्यास केला तर अहिल्यादेवी होळकर यांच्या इतिहासातील अनेक दाखले आजच्या काळातील स्त्रियांना मार्गदर्शक आहेत.अहिल्यादेवी होळकर यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही मात्र तरीही त्यासुद्धा एक स्त्री होत्या ही गोष्ट आजच्या काळातील स्त्री मनाच्या पटलावरती बिंबवल्याशिवाय आणि एक स्त्री सुद्धा असंख्य संकटांवरती मात करीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होऊ शकते ही गोष्ट लक्षात आल्याशिवाय राहत नाही. ती प्रतिकूल परिस्थिती होती तर आज अनुकूल परिस्थिती पाहायला मिळते, प्रश्न तेच आहेत पण त्या प्रश्नांचं स्वरूप वेगळ आहे आणि म्हणून याच प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी हा लेख प्रपंच....

तो काळ होता धार्मिक रूढी परंपरांचा व्हायरस समाज व्यवस्थेत पसरलेला होता, यात स्त्रिया चूल आणि मूल पद्धतीत जणू लॉकडाऊन झालेल्या होत्या. शिक्षणासोबत सार्वजनिक जीवनातील अधिकार नाकारलेले होते.शिक्षणाशिवाय पर्याय नाही ही गोष्ट लक्षात आल्यानं अहिल्यादेवी यांनी मोडी लिहिणं, वाचणं, सुचक पत्र व्यवहार करणे यासारखे प्रशिक्षण घेतलं पर्यायाने हीच गोष्ट अहिल्याते आदर्श राज्यकर्त्या अहिल्यादेवीहोण्यामध्ये मैलाचा दगड ठरली.  काळानुसार आवश्यक असणारे शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही, लिहिणं वाचणं याबरोबर राज्य वाचवण्यासाठी आवश्यक असणार घोडेस्वारी करण, तह करणे, तहाच्या अटी मान्य करणे, मोर्चे बांधणी करणे, यासारखे प्रशिक्षणही अहिल्यादेवींनी घेतलं, ही गोष्ट आजच्या काळातील स्त्रियांसाठी आदर्श  म्हणावी लागेल. आज मुलींना शिकवण म्हणजे दहावी, बारावी, जास्तीत जास्त पदवीपर्यंत शिक्षण देणे. आजच्या काळातील स्त्रियांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण आत्मसात करायला हवं. अहिल्यादेवी होळकर यांच्यासारखं काळाच्या ही दोन पावलं पुढे चालाव लागेल. शाळांमधून मिळणारे शिक्षण जरी शस्त्रम्हणून वापरता येत असलं तरी विज्ञान,कायदा, तंत्रज्ञानाच्या जोरावरती जगण्याचे शास्त्रशिकणं अत्यंत गरजेचे आहे. हीच गोष्ट अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनामधून शिकायला मिळते. माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी म्हणतातदेश को उचा उठाने के लिए अहिल्यादेवी के चारित्र की पवित्रा आवश्यक है”.

समाज व्यवस्थेच्या रुढीपरंपरांच्या विळख्यात अनेकदा अहिल्यादेवींचा आयुष्य सापडलं मात्र त्यातूनही मार्ग काढत नवा इतिहास घडविण्याचे काम अहिल्यादेवीने केल. अहिल्यादेवीच लग्न त्या वेळच्या रूढी परंपरांप्रमाणे आठव्या वर्षी झालं. ही गोष्ट त्यांच्या हातात नव्हती मात्र अहिल्यादेवींना जेव्हा जेव्हा शक्य झालं तेव्हा तेव्हा अनिष्ट रूढी परंपरांना लाथ घालण्याचं काम त्यांनी केलं. पती खंडेराव होळकरांचा मृत्यू झाला, त्यावर अहिल्यादेवींना सती जाण्यास सांगण्यात आलं. मात्र पतीचा मृत्यू होणं ही त्या स्त्रीची चूक नसते पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीने सती जाणं ही शिक्षा तिला कशासाठी ? अहिल्यादेवींनी सती जाणं तहकूब केलं. खंडेरावांच्या दोन स्त्रिया परधर्मीय होत्या या कारणास्तव भटजींनी श्राद्धाच्या वेळी पाणी घालण्यास नकार दिला त्यावेळी नाती काय फक्त धर्माची असतात का?” या शब्दात भटजींना ठणकावलं. धर्म आहे, रूढी-परंपरा डोळे झाकून स्वीकारण्यापेक्षा अंधश्रद्धा कर्मकांड आणि अनिष्ट रूढींच्या विरोधात उभे राहण्याची ताकद अहिल्यादेवींच्या विचारात आहे. तुकाराम महाराज म्हणतात "वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी वाहवा भार माथी" या उक्तीप्रमाणे  धर्मग्रंथांच्या नावावरती बाजार मग तो बुवाबाजीचा असो, की स्वामी-बाबांचा असो, याला नाकारण्याची ताकद आजच्या काळातील स्त्रियांनी ठेवायला हवी.

संत बहिनाई सांगते

               "नको नको रे ज्योतिषा नको हात माझा पाहू..

               माझे दैव माले कये माझ्या दारी नको येऊ..

व्रत वैकल्यातील महालक्ष्मीच्या कथेपासून ते सत्यवानाच्या सावित्रीपर्यंत भाकडकथांचा इतिहास झुगारून लावत , स्वराज्य संकल्पक जिजामातांपासून ते ज्योतिबांच्या सावित्री पर्यंतचा इतिहास अंगीकारला पाहिजे. ”जोपर्यंत हरणांचा इतिहास, हरणं लिहीत नाहीत जाणत नाहीत वाचत नाहीत तोपर्यंत शिकाऱ्याच्या शौर्यगाथाच   ऐकाव्या लागणार". स्त्री अस्मितेसाठी ऐतिहासिक क्रांती करणाऱ्या महानाईकांचा इतिहास आजच्या काळातील स्त्रिया वाचणार नाहीत तोपर्यंत स्त्री अस्मितेवरची प्रश्नचिन्ह पुसट होताना दिसणार नाहीत.

अहिल्यादेवी होळकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत ,लहान वयात मुलींचे लग्न लावने हे त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे ही गोष्ट लक्षात घेऊन स्वतःच्या मुलीचा मुक्ताबाईचा विवाह हा वयाच्या अठराव्या व्या वर्षी लावला.आजच्या काळातही बऱ्याचदा चोरून लपवून, कायदा डावलून लहान वयात मुलींची लग्न लावली जातात. लहान वयात मुलींची लग्न लावणं हे त्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे लहान वयात मुलींची लग्न लावणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्या मुलींच्या आयुष्यासाठी सुद्धा घातक आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजेस्त्रियांच्या संरक्षणासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवला जातो, पण मुळात स्त्रियांच्या संरक्षणासंदर्भात स्त्रियांच्याच बाजूने पावलं उचलणं जाणं गरजेचं आहे यावर मात्र कोणी बोलत नाही. स्त्रियांना संरक्षण देणे हे केवळ त्यांच्या नातेवाईकांची आणि पोलिसांची जबाबदारी नाही आणि पोलीस तरी कोणा कोणाला संरक्षण देत बसणार. तेवढी पोलीस यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध तरी आहे का? अहिल्यादेवी होळकर यांनी 2000 स्त्रिया शस्त्र पारंगत युद्ध पारंगत केल्या होत्या. स्त्रियांना स्वसंरक्षणाचे धडे तर दिलेच दिले सोबतच राज्याच्या रक्षणासाठी त्यांना सैन्यात भरती करून घेतलं. जसे मुलींना संगीत, नृत्य, यांचे शिक्षण दिलं तसंच कराटे( मार्शल आर्ट) , बॉक्सिंग यासारख शिक्षणही दिलं पाहिजे जेणेकरून याच मुली स्वतःचे संरक्षण स्वतः करतील यासाठी शासन दरबारी सुद्धा प्रयत्न होणे तेवढेच गरजेचे आहे. मुली-महिला यांच्यासाठी स्वसंरक्षणाचे शिक्षणही सक्तीचं करायला पाहिजे. चंद्रावत नरेशाचा अहिल्यादेवींनी हातात तलवार घेऊन केलेला पराभव असेल की मंडरपसिंहाचा केलेला बंदोबस्त असेल की पुरुषी अहंभावाची भाषा बोलणाऱ्या महादजी शिंदेंना खडे बोल सुनावणी असेल अहिल्यादेवी यांनी स्त्री ही अबला नसून सबला आहे हेच दाखवून दिलं. . संत जनाबाईंच्या शब्दात

 " स्त्री जन्म म्हणून व्हावे उदास

अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्याचे अनेक पैलू आहेत मात्र यापैकी एखाद्या विचारांचा पैलू जरी आजच्या स्त्री पुरुष  मेंदूच्या पटलावरती पडला तरी मानवी जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही

  आजच्या समाजात दिसणारी स्त्री ही जन्माला येत नाही, तर ती जन्माला घातली जाते. जन्मानंतर माणूस म्हणून जन्माला आलेल्या त्या व्यक्तीला 'स्त्री' बनवलं जातं. स्त्री कधीच लांब केस, साडी, बांगड्या, अन् पैजण घालून जन्माला येत नाही. जन्मानंतर तिला तसं बनवलं जातं. मुलीने काय खावं? कोणते खेळ खेळावे? कोणती कामे करावी? कोणत शिक्षण घ्यावं? तिने कश्या मुलासोबत लग्न केलं पाहिजे? याचे मापदंड आधीच ठरवून ठेवलेले असतात त्याप्रमाणे तिला घडवलं जातं. जेव्हा स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये तुलना केली जाते तेव्हा स्त्री ही पुरुषांपेक्षा नाजूक, कुमकुवत, कमी बुद्धीची असल्याचं सांगितलं जातं. आणि मग घरात काय नि दारात काय स्त्रीला दुय्यम वागणूक मिळते. शाळेत सुध्दा तो डोंगर...ती टेकडी.., तो बंगला.. ती झोपडी..तो कप..आणि ती बशी... पुल्लिंगी ते मोठे आणि स्त्रीलिंगी ते लहान हेच शिकवले जाते. मुळात इथली व्यवस्थाच उच-नीच अश्या भेदावर उभारली आहे. हलकी कामे स्त्रीच्या वाट्याला आणि अवजड कामे पुरुषाला दिली जातात. आजही शेतात आणि बऱ्याच ठिकाणी पुरुषांचा पगार जास्त आणि स्त्रीला कमी असतो. मुळात स्त्रीला अवजड कामे जमत नाहीत हे उत्तर जेवढं खरं आहे तेवढंच स्त्रीला नाजूक कोणी बनवलं याच पण उत्तर महत्वाचं आहे. आपण जसे मुलाला घडवतो तसेच मुलीला का घडवत नाही? जी कामे मुलगी करते ती मुलाला का सांगू नये? का? का? आणि का? याच उत्तर आहे का तुमच्याकडे?

                किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?

               मरेपर्यंत राह्यचे काय असेच युद्धकैदी?

नामदेव ढसाळ यांनी व्यवस्थेला विचारलेला प्रश्न तुम्ही कधी विचारणार आहात

  समाजात स्त्रीला नावं ठेवणारे खूप सापडतील पण स्त्रीला तिचे अधिकार देणारे मोजकेच सापडतील. मुलगी घराबाहेर पडते तेंव्हा तिला स्कार्प किंवा बुरखा घालण्याचा सल्ला देण्यापेक्षा मुलाला मुलींकडे वाकड्या नजरेने पाहू नको हा सल्ला देणे गरजेचे नाही का? आजच्या काळात महिलांचा वापर करून राजकीय पोळी भाजणे, राजकारणात फक्त नावाला त्यांना पदावरती बसवणे , महिलांना पुढे करून इतरांवर गुन्हें दाखल करणे, महिला अन्याय,अत्याचाराचं राजकारण करणे यासारख्या गोष्टी पाहायला मिळतात मुळात महिलांचा सन्मान करणे हे आपल्या सगळ्यांचीच सामाजिक बांधिलकी आहे. आजची परिस्थिती पाहिली तर स्त्रीने कसले कपडे घालावे, यापासून ओढणी, हिजाब ,बुरखा, लव जिहाद अशा प्रश्नांकडे जेवढं गांभीर्याने पाहिलं जातं तेवढेच स्त्री अस्मितेबाबत, स्त्री संरक्षणाबाबत, स्त्री सबलीकरणाबाबत, गांभीर्याने पाहिले जात नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल. मात्र यातून बाहेर पडण्यासाठी अहिल्यादेवी होळकर,राजमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, त्याग मूर्ती रमाई आंबेडकर या महानायिकांचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे

 मुलींनी सुध्दा फक्त पांढरी तोंडे करीत फिरण्यापेक्षा आपण उच्च शिक्षणं घ्यावं, स्वताच्या पायावर उभे राहावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे नाही का? आपले सौंदर्य वयाच्या काही काळापर्यंत साथ देणार आहे पण आपण घेतलेलं शिक्षणं हे आयुष्यभर साथ देणार आहे हा विचार मुलींनी का करू नये? आपला जन्म हा कोणाची सुंदर पत्नी, किंवा मायाळू आई होण्यासाठी झालाय का? फक्त हा प्रश्र्न मुलींनी स्वतः ला विचारायला हवा. यासाठी माणूस म्हणून या व्यवस्थेची काही जबाबदारी आहे ती आपण कधी पाळणार आहोत. माझ्या देशातील स्त्री निर्भिडपणे शाळेत जावी, उच्च शिक्षित व्हावी, तिलाही मुलांप्रमाणे घडवावे आणि मुलाला सुद्धा निदान स्वतःची भांडी धूनी धुता यावी, स्वयंपाक करता यावा यासाठी समाजाने आता बदल केला पाहिजे. येणाऱ्या पिढीला स्त्री अथवा पुरुष म्हणून घडवणयापेक्षा माणूस म्हणून घडवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.तेंव्हाच स्त्री आणि पुरुष हे समतेच्या पातळीवर येतील. “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारीहे आता बदलून जिच्या हाती ज्ञान- विज्ञान- तंत्रज्ञानची दोरी ,ती जगाते उद्धारीहे असायला पाहिजे. उपवास, व्रत, पूजा, पाठ, यात महिलांनी गुरफटून जाऊ नये. बुवा- बाबा - स्वामी - देवऋषी- ग्रहण - मंगळ यात अडकून पडता मुली आणि महिला यांनी शिक्षण - व्यवसाय - नोकरी - विज्ञाननिष्ठ - आणि स्वावलंबी होण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्याशिवाय स्त्रीयांना सन्मान कसा प्राप्त होणार बरे? याचाही विचार मुली महिला पुरुष सर्वांनी करायला हवा.

. इंस्टाग्राम सारख्या माध्यमांवर ली-मॅचिंग करण्यापेक्षा आजच्या काळातील तरुण-तरुणींनी स्वतःच्या आयुष्याशी महापुरुषांच्या आयुष्याची क्लिप-मॅच करणं अत्यंत गरजेचे आहे

 

 

ॲड. बिभीषण रुक्मिणी मोहन    गदादे सं-७७०९३१३४३५

देशमुखवाडी, राशीन, ता. कर्जत अहमदनगर.

(लेखक हे कवी, व्याख्याते, निवेदक असून सध्या पुणे येथे वकिली करीत आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजकारणाच्या चिखलात मतदाराचा विश्वासघात होतोय?

राजकारण...आणि आम्ही.

तुम्ही तुमचे पक्ष, झेंडे अन् बाप वाचवले... आमच्या शेतकरी बापाचं काय??