माळी समाजातील तरूणांची दशा व दिशा
माळी समाजातील तरूणांची दशा व दिशा
ॲड. बिभीषण गदादे
पाठीमागच्या पिढीच्या खांद्यावर उभी राहून पुढची पीढी जन्म घेत असते. गेल्या पीढीतील माळी समाजाच्या अर्थिक सामाजिक राजकिय उंचीवर आताच्या फळीतील व पिढीतील माळी तरूणांची उंची लक्षात येईल. त्या अर्थाने या पिढीवर पाठीमागच्या पिढीचा मोठा प्रभाव आहे हे नाकारून चालणार नाही. रोटी ,कपडा, मकान या संघर्षातच आमची अगोदरची पिढी खर्च झाली हे वास्तव आहे. आता त्या अर्थाने सद्यस्थितीतील धडपड्या तरूणांना चांगले दिवस आहेत. रोटी, कपडा, मकान च्या पलिकडे व्यावसायिक व शैक्षणिक उंचीवर जाण्याचा मानस आताच्या तरूणांकडे दिसतो. कारण रोटी कपडा पुरता संघर्ष राहिला नाही.व्यवसाय व शिक्षणातही अग्रेसर राहिलेला तरूण आज पहायला मिळतो. पाठीमागच्या पिढीचे हेच उपकार आहेत. आता ज्यांच्या पाठीमागच्या पिढीने हातपाय हलवले नाहीत त्यांना अर्ध आयुष्य तरी प्राथमिक गरजांच्या साठी खर्च करावं लागत आहे हे वास्तव. शिक्षण, मती, निती या पायर्या चढलेला तरूण या प्रचंड चढाओढीच्या युगात उभा राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. तरिही वित्त, व सत्ता याबाबतीत या पिढीला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
परिवर्तन ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे यात जी पिढी कमी पडते त्या पिढीच्या नंतरच्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. आजघडीला तरूणांना शिक्षण घेण्यासाठी घरातून, समाजातून प्रोत्साहन मिळत आहे. व्यवसायासाठी बरे दिवस आहेत. पन शिक्षण व व्यवसायात जेव्हा पडझड होते तेव्हा मात्र पुन्हा उभं राहण्याचे बळ मिळत नाही. त्याची अनेक कारणे सांगता येतील. एकतर तेवढा अर्थिक धनसंचय नाही. आहे या स्थितीत प्रचंड स्पर्धा असल्याने नव्या तंत्रज्ञानाचे प्रयोग शक्य नाहीत. त्यात जोखिम खुप आहे. जैन समाजातील लोकांप्रमाणे समाजातील लोकांचं भक्कम पाठबळ मिळत नाही. म. फुले व डॉ बाबासाहेब यांच्या विचारांशी म्हणावी तेवढी नाळ जोडलेली नसल्याने कर्मकांडातून बाहेर पडलेलो नाही. घरातील नातेवाईकांचं प्रबोधन नाही म्हणून नव्या विचारांना पहिला विरोध घरातून होतो. शिक्षणात उद्योग शिक्षणाकडे आता कुठे भर आहे पन तेवढी उद्योजकता विकास नाही.
नव्या फळीतील तरूणांना व्यवसाय करताना येणार्या अडचणी, त्यांना आवश्यक मार्गदर्शन, पडत्या काळात समाजाचा आवश्यक हात, नातेवाईकांचं पाठबळ या सगळ्यावर कार्य करने गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम तरूणच कोणाच्या हातचं बाहुलं बनणार नाही. तीच खरी समाजाची ताकद असेल. प्रबोधनाचे कार्यक्रमातून कुंटूबातील वर्गाला दिशा देणं शक्य आहे. धर्माच्या व जातीय द्वेशाच्या साठी तरूण वापरला जायला नको याची काळजी घेणं गरजेचं. आताच्या काळात माळी तरूणांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी पाठबळ मिळणं गरजेचं आहे. बाहेर प्रचंड स्पर्धा असल्याने माळी तरूणांनी पार्टनरशिप च्या माध्यमातून एकत्र येऊन विकास साधने गरजेचं आहे. त्यासाठी माळी समाजातील उद्योजकांचे मेळावे भरवणे गरजेचं आहे. त्यातून नव्या शिक्षीक तरूणांना रोजगाराचा मार्गही खुला होईल. विचारांची व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होईल. नव्या वाटांचा शोध घेता येईल. समाजाच्या ताकदीला एक दिशा मिळेल.
________________
🖊️अॅड. बिभीषण गदादे (लेखक, निवेदक, तथा व्याख्याता)
सं-७७०९३१३४३५*

व्यवसायातील पडझडीची अचूक कारणे दिलीत आपण.
उत्तर द्याहटवाYes sir
हटवा